Abhijeet Dipke : मला अटक करा… अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले…
दिल्लीतील मोठ्या आंदोलनासाठी निघालेले CGP संस्थापक अभिजीत दिपके यांनी सरकारला थेट आव्हान दिले आहे. "मला अटक करा," असे म्हणत त्यांनी पोलिसांच्या बंदोबस्तावर टीका केली. त्यांनी दिल्लीतील रेल्वे, मेट्रो बंद करण्याच्या निर्णयाला "इमर्जन्सीपेक्षाही वाईट" म्हटले असून, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
CGP चे संस्थापक अभिजीत दिपके दिल्लीतील मोठ्या आंदोलनासाठी रवाना झाले आहेत. यापूर्वीही त्यांनी दिल्लीत आंदोलन केले होते. यावेळी जंतर-मंतर येथे शांततापूर्ण मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने त्यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
“मला ताब्यात घ्यायचे असेल, तर घ्या; मला अटक करा,” असे खुले आव्हान दिपके यांनी दिले आहे. दिल्लीत रेल्वे, मेट्रो सेवा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नरेंद्र मोदी सरकारने दिल्लीला भारत-पाकिस्तान सीमेसारखे बनवले असून, एवढा पोलीस बंदोबस्त कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. देशाचे नागरिकच आंदोलनाला येत असताना सरकार एवढे घाबरले आहे, ही स्थिती इंदिरा गांधींच्या आणीबाणीपेक्षाही वाईट असल्याचे दिपके यांनी नमूद केले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे.
