Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन आदित्य ठाकरेंना मानहानीची नोटीस देण्यासाठी मातोश्रीवर येणार असल्याचे जाहीर होताच, ठाकरे गटाचे शिवसैनिक मातोश्रीबाहेर एकवटले. मातोश्री हे आमचे श्रद्धास्थान असून, येथे येण्याची हिंमत कोणी केल्यास शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. शिवसैनिकांनी हे प्रकरण राजकीय सूडबुद्धीने चालवले जात असल्याचा आरोप केला.
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांना मानहानीची नोटीस बजावण्यासाठी मातोश्री निवासस्थानी येणार असल्याची घोषणा केल्यानंतर, ठाकरे गटाचे शिवसैनिक मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने जमले आहेत. “मातोश्री हे आमचं श्रद्धास्थान आहे. येथे येण्याची हिंमत कोणी करतं, ते पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत,” अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली. शिवसैनिकांनी स्पष्ट केले की, त्यांना कुणाचाही आदेश नाही, ते स्वखुशीने मातोश्रीच्या रक्षणासाठी आले आहेत.
“मातोश्रीची काळजी घेणे हे शिवसैनिक म्हणून आमचं काम आहे,” असे एका शिवसैनिकाने सांगितले. सतीश सालियन यांनी केलेल्या आरोपांनंतर दाखल झालेल्या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नावे आल्याचा संदर्भ देत, शिवसैनिकांनी हे सर्व राजकीय सूडबुद्धीने घडवले जात असल्याचा आरोप केला. जनतेला आमच्या नेत्यांबद्दल माहिती आहे आणि त्यांच्यावरील असे शिंतोडे उडवण्याचे प्रयत्न शिवसेना हाणून पाडेल, असेही शिवसैनिकांनी नमूद केले.
