Ajit Pawar NCP : दावे दमदार पण हतबल शिलेदार? दादांच्या राष्ट्रवादीची कोंडी, युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?

| Updated on: Dec 23, 2025 | 11:32 AM

नाशिकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भाजपसोबत युतीसाठी गिरीश महाजनांची प्रतीक्षा करावी लागली. तीन मंत्रीपदे असूनही दादा गटाचे नेते चर्चाविना परतले, ज्यामुळे त्यांच्या सत्तेतील स्थिती हतबल झाल्याचे चित्र समोर आले. पक्षाच्या राष्ट्रीय दर्जाच्या दाव्यांच्या विरुद्ध स्थानिक पातळीवरील ही कोंडी चर्चेचा विषय ठरली आहे.

नाशिक जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तास्थानावरची स्थिती सध्या हतबल दिसत आहे. “सरकारच्या चाव्या माझ्याकडे आहेत” असा दावा करणाऱ्या अजित पवार गटाच्या नेत्यांना युतीच्या चर्चेसाठी भाजपच्या मंत्र्यांची वाट पाहावी लागली. नाशकात दादा गटाचे मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर आणि माजी खासदार समीर भुजबळ हे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची वाट पाहत होते. गिरीश महाजनांचा ताफा निघू लागल्यावर आमदार खोसकर यांनी त्यांना चर्चेसाठी पाच मिनिटे वेळ देण्याची विनंती केली, मात्र महाजनांचा ताफा चर्चा न करताच मुंबईकडे रवाना झाला. तीन मंत्रीपदे दिलेल्या नाशिक जिल्ह्यातच दादा गटाच्या नेत्यांना भाजपच्या मंत्र्यांपुढे युतीसाठी विनंत्या कराव्या लागल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अजित पवारांनी सत्तेत सहभागी होताना राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा परत मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला होता, मात्र सध्या स्थानिक पातळीवर त्यांच्या समर्थकांना संघर्ष करावा लागत असल्याचे हे चित्र आहे.

Published on: Dec 23, 2025 11:32 AM