Angar Nagar Panchayat: अनगरच्या ‘मालकां’ना महिलेनं ललकारलं, पाटलांना भिडणाऱ्या उज्जवला थिटे कोण?

Angar Nagar Panchayat: अनगरच्या ‘मालकां’ना महिलेनं ललकारलं, पाटलांना भिडणाऱ्या उज्जवला थिटे कोण?

| Updated on: Nov 21, 2025 | 8:48 AM

सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत उज्वला थिटे यांनी राजन पाटलांच्या दशकांव्यापी राजकीय वर्चस्वाला आव्हान दिले. उमेदवारी अर्ज भरताना त्यांना धमक्यांना सामोरे जावे लागले आणि पोलीस संरक्षणात अर्ज भरावा लागला. सूचकाची सही नसल्याचे कारण देत त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला, मात्र थिटे यांनी न्यायालयाची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीमध्ये अनेक दशकांपासून वर्चस्व असलेल्या राजन पाटलांना यंदा उज्वला थिटे या महिलेने आव्हान दिले. अनगरच्या राजकारणात हा मुद्दा सध्या राज्यभरात चर्चेत आहे. राजन पाटलांच्या सून प्राजक्ता पाटील यांच्याविरोधात दादा गटाच्या राष्ट्रवादीकडून उज्वला थिटे लढतीत उतरल्या होत्या. मात्र, आरोपानुसार, राजन पाटील समर्थकांनी थिटेंना अर्ज भरण्यापासून रोखण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. यामुळे परिस्थिती इतकी गंभीर झाली की, सत्तेतील दादा गटाच्या उमेश पाटलांनी सरकारकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली.

यानंतर, बंदूकधारी पोलिसांच्या बंदोबस्तात उज्वला थिटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना प्रचंड गर्दी, बॅरिकेडिंग आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा होता, ज्यामुळे अनगरला छावणीचे स्वरूप आले होते. एका महिलेला प्रस्थापितांविरोधात अर्ज भरण्यासाठी इतके संरक्षण द्यावे लागल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली.

पोलिसांच्या संरक्षणात अर्ज भरल्यानंतरही, सूचकाची सही नसल्याचे कारण देत तहसीलदारांनी उज्वला थिटेंचा अर्ज बाद केला. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी यावर आक्षेप घेतला होता. सरस्वती शिंदे यांनी नंतर माघार घेतल्याने भाजपच्या प्राजक्ता पाटील यांचा विजय सोपा झाला. मात्र, आपला अर्ज कट-कारस्थानाने बाद केला गेला असून, सूचक म्हणून मुलाची सही असल्याचे सांगत उज्वला थिटे यांनी न्यायालयात लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.

Published on: Nov 21, 2025 08:48 AM