शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार आणि राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार आणि राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

| Updated on: Jul 24, 2025 | 11:19 AM

शेतकरी कर्जमाफीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मागण्यांसाठी त्यांनी आज राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा” या प्रमुख मागणीसाठी बच्चू कडू यांनी विदर्भात पदयात्रा काढली होती. या पदयात्रेदरम्यानच आंदोलनाची रणनीती ठरवण्यात आली. आता सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

परतवाडा येथे प्रहार जनशक्ती पक्षाने शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अमरावती-परतवाडा महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी आणि प्रहार कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. टायर जाळून रास्ता रोको करत त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. राज्यभरात प्रहार संघटनेने शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी, मच्छीमार, मेंढपाळ आणि इतर घटकांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या आणि इतर समाजघटकांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जाण्याची अपेक्षा आहे.

Published on: Jul 24, 2025 11:17 AM