Balasaheb Thackeray Statue : बाळासाहेबांचा पुतळा झाकला अन् मुंबईतील राजकारण तापलं! ठाकरे सेनेकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा

| Updated on: Jan 06, 2026 | 11:16 AM

मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकल्याने राजकारण तापले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने यावर आक्षेप घेत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे, तर डागडुजीचे काम सुरू असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे आचारसंहिता आणि राष्ट्रपुरुषांच्या दर्जावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील फोर्ट परिसरात, रिगल सिनेमाजवळ असलेला हा पुतळा प्रचारादरम्यान झाकण्यात आला आहे. यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात बाळासाहेबांची भीती असल्याचा आरोप केला आहे. बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष असताना त्यांचा पुतळा का झाकला जात आहे, असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेने उपस्थित केला आहे.

महात्मा गांधी किंवा अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्यांना झाकले जात नाही, तर बाळासाहेबांच्या पुतळ्याला का झाकले, अशी विचारणा त्यांनी केली. दुसरीकडे, पुतळ्याची साफसफाई आणि डागडुजी सुरू असल्याने तो झाकण्यात आल्याची माहिती मिळते आहे. मात्र, ऐन आचारसंहितेत डागडुजी कशी करता येते, असा सवालही विरोधकांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेचे फलकही झाकण्यात आल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे वादात आणखी भर पडली आहे.

Published on: Jan 06, 2026 11:16 AM