Nitesh Rane : ‘…म्हणून मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होतोय’ फडणवीसांना लिहिलेल्या पत्रातून नितेश राणेंचा गंभीर आरोप

| Updated on: Sep 23, 2022 | 10:13 AM

Nitesh Rane letter to Devendra Fadnavis : मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जातेय आणि मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत आहे, अशा उलट्या बोंबा मारणं आदित्य ठाकरे आणि शिवसेनेकडून सुरु असल्याची टीका नितेश राणेंनी केली.

Follow us on

विनायक डावरुंग, प्रतिनिधी, मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून मुंबईतल्या विकासकांबाबत (Mumbai Real Estate and Developers) आक्षेप नोंदवलाय. आदित्य ठाकरे यांच्यावरही नितेश राणेंनी या पत्राद्वारे निशाणा साधलाय. टक्केवारी देणाऱ्या विकासकांमुळेच मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होतोय, असं नितेश राणे यांनी म्हटलंय. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जातेय आणि मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत आहे, अशा उलट्या बोंबा मारणं आदित्य ठाकरे आणि शिवसेनेकडून सुरु असल्याची टीकादेखील नितेश राणेंनी केली. पण वास्तवात त्यांच्या जवळच्याच असलेल्या आणि टक्केवारी मिळवून देणाऱ्या विकसकांमुळे नाईलाजास्तव मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होतो आहे, असा आरोप नितेश राणेंनी केलाय. त्यामुळे मराठी कुटुंबांना आपलं हक्काचं घर विकासकाला किंवा एजंटला स्वस्त दरात विकली जात असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय. या प्रकरणी सरकारच्या वतीने ठोस पावलं उचलण्याची गरज असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय. टक्केवारी देणाऱ्या आणि जनतेला वेठीस धरणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या पत्रातून नितेश राणे यांनी केलीय.