Raj Thackeray : राज ठाकरेंच्या घराबाहेर गर्दीच गर्दी अन् उडाला गोंधळ, पोलिसांचीही धावपळ, शिवतीर्थबाहेर मध्यरात्री नेमकं घडलं काय?
राज ठाकरेंच्या शिवतीर्थच्या अगदी समोरच कारने पेट घेतल्याची घटना घडल्याने पोलिसांची चांगलीच धावपाळ उडाली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेते अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर मध्यरात्री एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. दादर येथील छत्रपती शिवाजीपार्क परिसरात राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने राज ठाकरे यांच्या घरी देखील लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. राज ठाकरे यांच्या घरी बाप्पा विराजमान झाल्याने राजकीय वर्तुळातील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची दर्शनासाठी रिघ लागल्याचे दिसतंय. अशातच काल मध्यरात्री राज ठाकरे यांच्या घराबाहेर एकच गोंधळ उडाला. राज ठाकरेंचं शिवतीर्थ असलेल्या निवासस्थानाबाहेर एका इनोव्हा कारने अचानक पेट घेतला आणि परिसरात एकच गोंधळ उडाला.
दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे या गाडीला आग लागल्याची माहिती मिळतेय. धक्कादायक म्हणजे आग लागली तेव्हा गाडीत चालकही होता. मात्र सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. ही घटना शिवतीर्थच्या अगदी समोरच घडल्याने पोलिसांची देखील चांगलीच धावपाळ झाली. वाहन जळालेल्या ठिकाणाचा संबधित कारच्या कंपनीकडून पंचनामा करण्यात येत आहे. संबधित गाडी ही कुर्ला येथे कंपनीच्या गॅरेजला नेण्यात आली आहे.
