BJP : नरकातला राऊत… त्या पुस्तकासंदर्भात संजय राऊतांना पत्र लिहीणार म्हणत बावनकुळेंचं टीकास्त्र, म्हणाले….
ईडी कोठडी आणि आर्थर रोड जेलमधील कारावासात असताना आलेल्या अनुभावांबद्दलही संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’या पुस्तकात म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी पार पडणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेते संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. राऊत यांनी या पुस्तकात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली, असा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. संजय राऊत यांच्या या पुस्तकासंदर्भात बोलताना भाजपच्या चित्रा वाघ यांनी राऊतांवर निशाणा साधत गटारातील अर्क असं नाव लेखकाला शोभलं असतं असं म्हटलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावत कथा, कादंबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही. त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही, असं म्हटले. आता भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राऊतांच्या पुस्तकाचं नाव बदलण्याची गरज आहे. राऊतांनी नरकातला स्वर्ग असं नाव त्या पुस्तकाला दिलंय पण ते नरकातला राऊत असं असायलं हवं, असं म्हणत जिव्हारी लागणारी टीका केली आहे. दरम्यान, पुस्तकाचं नाव बदलण्यासाठी राऊतांना पत्र लिहीणार असल्याचेही बावनकुळे म्हणालेत.
