Dhananjay Munde | गुंगी गुडियावरून राजकारण पेटलं!; धनंजय मुंडेंनी काँग्रेसला दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले…
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसने केलेल्या "गुंगी गुडिया" या टीकेवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार पलटवार केला आहे. काँग्रेसने महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याविषयी द्वेषातून अशी टीका केली असल्याचा आरोप करत, त्यांनी काँग्रेसला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरुवातीच्या राजकीय प्रवासाची आठवण करून दिली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसने केलेल्या “गुंगी गुडिया” या टीकेवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार पलटवार केला आहे. काँग्रेसने महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याविषयी द्वेषातून अशी टीका केली असल्याचा आरोप करत, त्यांनी काँग्रेसला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरुवातीच्या राजकीय प्रवासाची आठवण करून दिली.
बीड येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे म्हणाले की, काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून सुनेत्रा पवार यांच्यावर करण्यात आलेली टीका ही अत्यंत दुर्दैवी आहे. “इंदिरा गांधी यांनाही सुरुवातीला अशाच प्रकारच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र त्यांनी आपल्या कणखर नेतृत्वाने देशात वेगळी ओळख निर्माण केली. त्याचप्रमाणे सुनेत्रा पवारही येणाऱ्या काळात सक्षम आणि कणखर नेतृत्व करून दाखवतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्याबाबत बोलताना मुंडे म्हणाले की, त्या पालकमंत्री म्हणून सलग दोन दिवस जिल्ह्यातील विविध बैठका घेण्यासाठी आल्या होत्या. बैठकीनंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली नव्हती, तर केवळ अधिकृत निवेदन देण्यासाठी माध्यम प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. निवेदनादरम्यान अजित पवार यांच्याशी संबंधित विषय निघाल्याने त्या भावनिक झाल्या होत्या. त्यावेळी काही माध्यम प्रतिनिधी प्रश्न विचारत असल्याने आपण ही पत्रकार परिषद नसल्याचे स्पष्ट करत शांतता राखण्याचे आवाहन केले होते, असे त्यांनी सांगितले.
धनंजय मुंडे यांनी आरोप केला की, काही जणांना बीड जिल्ह्यातील वातावरण शांत होऊ द्यायचे नाही. जाती-पातीचे राजकारण कायम ठेवण्यासाठी मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, सुनेत्रा पवार या सामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून, त्यांचे जिल्ह्यातील कामच त्यांच्या नेतृत्वाची ओळख ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी स्वतःबाबत झालेल्या काही चर्चांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. “माझ्या तब्येतीबाबत झालेल्या चर्चेचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. तसेच एका शेतकऱ्याशी संवादादरम्यान मी केवळ शांतपणे बोलण्याची विनंती केली होती. त्या घटनेचा विपर्यास करण्यात आला,” असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्यावरील काँग्रेसच्या टीकेनंतर धनंजय मुंडे यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, या वादावर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
