Eknath Shinde | हर्षवर्धन सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर आवाज कसा?
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसदेखील आपला उमेदवार रिंगणात उतरवेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत काँग्रेसने अखेर दानवे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसदेखील आपला उमेदवार रिंगणात उतरवेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत काँग्रेसने अखेर दानवे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “देशपातळीवर आमचा भाजपशी संघर्ष आहे. त्यामुळे राज्यात भाजपविरोधी भूमिका अधिक बळकट करण्यासाठी आम्ही शिवसेनेला पाठिंबा देत आहोत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभावी नेतृत्व उभं करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.” यासोबतच त्यांनी काँग्रेसकडून उमेदवार न देण्यामागील कारण स्पष्ट करताना “अंतरात्म्याचा आवाज” असल्याचेही नमूद केले.
दरम्यान, या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत सपकाळ यांना टोला लगावला. “ज्यांचा आत्माच हरवलेला आहे, त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज येतो का? असं मी पहिल्यांदाच ऐकत आहे,” असा उपरोधिक प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला. तसेच 2019 च्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना “तेव्हा अंतरात्मा कुठे होता?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तथापि, या सर्व घडामोडींनंतरही विधान परिषद निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. निवडणूक बिनविरोध होण्याच्या शक्यतेवर भाष्य करताना त्यांनी सर्व पक्षांचे आभार मानले आणि “महायुतीकडून अतिरिक्त उमेदवार दिलेला नाही,” असेही स्पष्ट केले. एकूणच, काँग्रेसने उमेदवार न देता शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अंबादास दानवे यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवड होण्याची शक्यता अधिक बळावली असून, राज्यातील राजकीय समीकरणांमध्येही यामुळे नवा बदल दिसून येत आहे.
