EVM Security : नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांमध्ये ईव्हीएमच्या सुरक्षिततेवरून वाद निर्माण झाला आहे. गोंदियामध्ये सील तोडल्याच्या आरोपावरून निवडणूक अधिकाऱ्याची हकालपट्टी झाली, तर परळी, सांगली आणि अन्य ठिकाणी स्ट्रॉंग रूमबाहेर राजकीय कार्यकर्त्यांनी पहारा दिला. मतमोजणी पुढे ढकलल्याने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांच्या निकालापूर्वी ईव्हीएमच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 21 तारखेला मतमोजणी होणार असली तरी, या दरम्यान ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम्सवर कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे ईव्हीएमचे सील तोडल्याचा आरोप झाल्यानंतर निवडणूक अधिकारी मोनिका कांबळे यांची हकालपट्टी करण्यात आली.
महाविकास आघाडीने या प्रकरणी आंदोलन छेडले होते. मोनिका कांबळे यांनी स्विच बंद असल्याची खात्री करण्यासाठी मशीन उघडल्याची कबुली दिल्यानंतर, कारवाईची मागणी करत विरोधकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. याचबरोबर, परळीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमची पाहणी करण्यास आलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलिसांची बाचाबाची झाली. संध्या देशमुख यांच्या पतीने ओळखपत्र दाखवूनही प्रवेश नाकारल्याचा आरोप केला.
सांगलीच्या आष्टामध्येही स्ट्रॉंग रूमबाहेर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले, तर सोलापूर आणि पुण्यातही ईव्हीएम सुरक्षिततेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. 2000 हून अधिक मतांची आकडेवारी वाढल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड नगरपालिकेसाठीही ईव्हीएम सीसीटीव्ही आणि पोलिसांच्या निगराणीत आहेत. मतमोजणी पुढे ढकलल्याने सरकार ईव्हीएममध्ये गडबड करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे.
