Bakri Eid | मिरा-भाईंदर ते घाटकोपर… बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा मोठा बंदोबस्त
मुंबईसह मिरा-भाईंदर परिसरात बकरी ईद शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बकरा आणणे आणि कुर्बानीच्या परवानगीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज संवेदनशील भागांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली.
मुंबईसह मिरा-भाईंदर परिसरात बकरी ईद शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बकरा आणणे आणि कुर्बानीच्या परवानगीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज संवेदनशील भागांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. स्थानिक पोलिसांसोबतच राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) तुकड्याही तैनात करण्यात आल्या असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, मिरा-भाईंदर परिसरात सुरुवातीचा तणाव निवळल्यानंतर नागरिकांनी शांततेत आणि उत्साहात बकरी ईद साजरी केली. भाईंदरमधील काही संवेदनशील सोसायट्यांमध्ये आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रहिवाशांनी पोलिसांच्या भूमिकेचं स्वागत करत, “वाद दुर्दैवी होता, मात्र आजचा सण आम्ही शांततेत आणि बंधुभावाने साजरा करत आहोत,” अशी प्रतिक्रिया दिली.
घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीत काल निर्माण झालेल्या तणावानंतर आजही मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोसायटी परिसरात बकऱ्यांची कुर्बानी दिली जात असल्याच्या तक्रारीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल भेट देत विरोध दर्शवला होता. त्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. मात्र आज सोसायटी सदस्यांनी अधिकृत ठिकाणी कुर्बानी केल्याची माहिती दिली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
तसेच गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम परिसरातही काही काळ तणावाचं वातावरण होतं. मात्र आज पोलिसांच्या कड्या बंदोबस्तात आणि शांततेच्या वातावरणात बकरी ईद साजरी करण्यात आली. मुंबई आणि ठाणे पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करत सोशल मीडियावर जबाबदारीने वागण्याचे निर्देश दिले आहेत.
