Raj Thackeray : IITच्या नावात मुंबई नाही, मी खूश…’या’ मंत्र्याला बॉम्बेचा कळवळा? राज ठाकरेंनी घेतला समाचार
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या आयआयटी बॉम्बेबाबतच्या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. जितेंद्र सिंहांचे विधान हे सरकारच्या मानसिकतेचे प्रतीक असून, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. मनसेने पवईतील आयआयटी गेटसमोर आयआयटी मुंबई असे फलक लावले असून, केंद्रीय मंत्र्यांच्या विधानानंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे.
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी आयआयटी बॉम्बे संदर्भात केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र सिंहांनी, “आयआयटी नावातलं बॉम्बेचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं” असे म्हटले होते. या विधानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी या विधानाला “सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक” असे संबोधले आहे. राज ठाकरे यांनी आरोप केला आहे की, “मुंबई नको बॉम्बेच हवं” यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
मनसेने पवईमधील आयआयटीच्या गेटसमोर आयआयटी मुंबई असे फलक लावून निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी, ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे, त्यांनी तो आग्रह सोडावा असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. मुंबईचे अधिकृत नाव मुंबई असून, प्रत्येक शासकीय, खाजगी संस्थेने तेच वापरणे बंधनकारक असल्याचे मनसेने अधोरेखित केले.
