India Alliance Protest : संसदेबाहेर इंडिया आघाडीचा मोर्चा, पोलिसांनी अनेक खासदारांना रोखलं अन्… दिल्लीत घडतंय काय?
'इंडिया' आघाडीने लोकसभा निवडणुकीत 'मतचोरी' झाल्याचा आरोप केला आहे. याच मुद्द्यावरून हा मोर्चा संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता.
लोकसभा निवडणुकीतील कथित ‘मतचोरी’च्या आरोपावरून ‘इंडिया’ आघाडीने दिल्लीत जोरदार निदर्शने केली. ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी संसद भवन ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. यामध्ये काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीतील अनेक पक्षांचे खासदार सहभागी झाले होते.
यावेळी, निवडणूक आयोगाने भाजपसोबत संगनमत करून मतदार याद्यांमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप ‘इंडिया’ आघाडीने केला. तसेच, अमोल कीर्तिकर यांची जागा चोरल्याचा आणि शिवसेनेचे नाव व चिन्ह चोरून दुसऱ्या चोरांच्या हाती दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला सुरुवातीला परवानगी दिली नव्हती, मात्र तरीही हा मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी संसदेच्या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता आणि काही ठिकाणी मोर्चा अडवण्याचा प्रयत्नही केला. दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी काढलेल्या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी अडवले, त्यामुळे खासदारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
