Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर… जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मुंबईकडे शांततापूर्ण कूच करण्याच्या रणनीतीचे मार्गदर्शन केले. त्यांनी मराठा समाजाला एकजूट राहण्याचे, आत्मसंरक्षणासाठी ‘गनिमी कावा’ वापरण्याचे आवाहन करत, सरकार आणि राजकीय पक्षांवर मराठ्यांच्या भावनांशी खेळल्याचा आरोप केला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आंदोलनाची रणनीती समजावून दिली. यावेळी त्यांनी शासनावर आणि राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली. जरांगे पाटील यांनी मराठ्यांना शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मुंबईकडे कूच करण्याचे आवाहन केले. पोलिसांकडून अडवणूक झाल्यास त्यांना बाजूला सारून पुढे जावे, परंतु कोणताही त्रास देऊ नये, असे त्यांनी सांगितले.
जर पोलिसांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर पळू नका, जागेवरच प्रतिकार करा आणि आत्मसंरक्षणासाठी ‘दबा धरा’ तंत्राचा वापर करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा आदर्श समोर ठेवून आपल्या गावांचा शिवार सांभाळत आंदोलन करावे. शांततापूर्ण आणि अदृश्यपणे आंदोलन करून सरकारवर दबाव आणावा, असे त्यांचे म्हणणे होते. नोकरदार आणि व्यावसायिक मराठ्यांनी संकटात सापडलेल्या आंदोलकांना मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार मराठ्यांच्या भावनांशी खेळत असून, आरक्षण न दिल्यास महाराष्ट्र बंद पाडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
