पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्… आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एका दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आमदारांच्या गावातच घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने हे कृत्य केले असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईक आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.
पुण्याच्या जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. तालुक्यात एका दहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या गावातच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणाने या चिमुकलीवर अत्याचार केले आणि त्यानंतर तिची हत्या केली. ही पीडित मुलगी घरी दुसऱ्या मुलासोबत खेळत असताना टीव्ही पाहत होती.
आरोपीने तिला ओळखीच्या नात्याने घराबाहेर नेले. गावाबाहेरील एका शेतात नेऊन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर तिची हत्या केली. पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनेच्या स्थळाचा पंचनामा आणि पुढील पाहणी सुरू आहे. या घटनेमुळे चिमुकलीचे कुटुंबीय आणि पिंपळवंडी गावातील ग्रामस्थ अत्यंत संतप्त झाले आहेत. त्यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची आणि त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा पसरली असून, लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
