KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार, चक्क… धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हेल्पलाइनवर मराठीत बोलण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कुत्र्यांच्या त्रासाची तक्रार करणाऱ्या महिलेला हेल्पलाइनवरील कर्मचाऱ्याने मराठी समजत नाही, हिंदीत बोला असे सांगितले. सुपरवायझर इरफानने आपण हैदराबादी असल्याचे कारण दिले. या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) हेल्पलाइनवर मराठीत बोलण्यास नकार दिल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुत्र्यांच्या त्रासाची तक्रार करण्यासाठी एका महिलेने हेल्पलाइनवर संपर्क साधला असता, तेथील कर्मचाऱ्याने तिला मराठीत बोलण्यास नकार दिला. मराठी समजत नाही, हिंदीत बोला असे त्या कर्मचाऱ्याने महिलेला सांगितले.
या घटनेची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. महिलेने मराठी येत नाही असे सांगितल्यावर, हेल्पलाइनवरील सुपरवायझर इरफानने स्वतःला हैदराबादहून आलेले आणि मराठी कमी येते असे म्हणत हिंदीत बोलण्याचा आग्रह धरला. महिलेने कुत्र्यांच्या नसबंदी आणि लसीकरणाबाबत तक्रार केली होती. त्यावर कर्मचाऱ्याने व्हॉट्सॲपवर पत्ता पाठवण्यास सांगितले. स्थानिक प्रशासनाच्या हेल्पलाइनवरच मराठी भाषेचा वापर टाळला जात असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत मराठी भाषेला प्राधान्य देणे अपेक्षित असताना, असा प्रकार घडल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेची दखल घेऊन प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
