धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की… वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
शिवसेना पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. मूळ राजकीय पक्ष आणि संसदीय पक्ष यातील फरक अधोरेखित करत, बहुमताच्या आधारे चिन्ह वाटप करणे हे घटनात्मकदृष्ट्या योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. पक्षांतर विरोधी कायद्यातील त्रुटींवरही या चर्चेत प्रकाश टाकण्यात आला.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांच्या वतीने महत्त्वाचा युक्तिवाद केला आहे. सिब्बल यांनी धनुष्यबाण हे चिन्ह कोणत्याही गटाला, उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांना, देऊ नये तर ते गोठवण्यात यावे अशी मागणी केली आहे. सिब्बल यांच्या युक्तिवादाचा मुख्य आधार म्हणजे मूळ राजकीय पक्ष आणि संसदीय पक्ष यातील फरक. संसदीय पक्षामधील बहुमत हे पक्षातून वेगळे होण्यासाठी किंवा मान्यता मिळण्यासाठी पुरेसे कारण असू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
पक्षांतर हे घटनात्मकदृष्ट्या योग्य नाही आणि निवडणूक आयोगाने संसदीय बहुमताच्या आधारे चिन्ह वाटप करणे हे घटनात्मक पाप आहे, असे त्यांनी म्हटले आहे. १९८५ साली राजीव गांधी यांच्या काळात लागू करण्यात आलेला दहाव्या अनुसूचीमधील पक्षांतर विरोधी कायदा ठिसूळ असून त्यात सुधारणांची गरज असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाकडून सूचित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे भारतीय राजकारणाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा अनंत कळसे यांनी व्यक्त केली आहे.
