पतीला न्याय द्या; ज्ञानेश्वरी मुंडेंचं भर पावसात आंदोलन
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी परळी-अंबाजोगाई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास अद्याप गतीमान झालेला नाही. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक व्हावी, या मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी परळी-अंबाजोगाई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात ज्ञानेश्वरी यांचे सासर आणि माहेर येथील सर्व नातेवाईकांनी सहभाग घेतला आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आल्यानंतर आता या प्रकरणासाठी 10 जणांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात एक सहायक पोलिस निरीक्षक, एक पोलिस उपनिरीक्षक आणि 8 कर्मचारी यांचा समावेश आहे. पोलिस तांत्रिक पुराव्यांवर विशेष लक्ष केंद्रित करत आहेत. हत्येत सहभागी असल्याचा आरोप असलेला आणि सध्या मकोकामध्ये फरार असलेला गोट्या गिते पोलिसांच्या नजरेत आहे. तरीही, आरोपींना अद्याप अटक न झाल्याने ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
