एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा, मुबईत मोठं घडणार?

एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा, मुबईत मोठं घडणार?

| Updated on: Aug 31, 2026 | 4:12 PM

1 सप्टेंबर रोजी मुंबईकडे कूच करणाऱ्या ओबीसी बांधवांच्या महाएल्गार रथाची तयारी पूर्ण झाली आहे. दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावरून हा मोर्चा निघणार असून, रथावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असेल. लक्ष्मण हाके यांनी शिंदे समितीला असंविधानिक आणि बेकायदा ठरवत, कुणबी नोंदी शोधणे म्हणजे मराठ्यांना आरक्षण नव्हे, असे स्पष्ट केले.

ओबीसी बांधवांकडून येत्या 1 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाएल्गार मोर्चासाठी महाएल्गार रथ पूर्णपणे तयार झाला आहे. दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावरून ओबीसी बांधवांचा हा महाएल्गार मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे. या रथाच्या मध्यभागी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यात आली आहे, ज्यामुळे मोर्चाला वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. दुसरीकडे अंतरावली सराटती मनोज जरांगे पाटील यांच मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु आहे.

या संदर्भात बोलताना, लक्ष्मण हाके यांनी शिंदे समितीच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, “शिंदे समितीला कोणताही संवैधानिक अधिकार नाही. ही समितीच मुळात बेकायदा आहे.” कुणबी नोंदी शोधण्याच्या प्रयत्नांवरही त्यांनी आक्षेप घेतला. “कुणबी नोंदी शोधणे म्हणजे मराठ्यांना आरक्षण देणे असं नाही,” असे हाके यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाने काढलेले मोठे मोर्चे किंवा केलेल्या आंदोलनामुळे व्यवस्थेतील सूक्ष्म घटकांचे आरक्षण काढण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे हाके यांनी ठामपणे सांगितले. “तसे असते तर मग झुंडींचे आणि कळपांचेच राज्य आले असते,” अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांनी शिंदे समितीच्या कार्यपद्धतीची तुलना लांडग्यांच्या टोळीशी करत कठोर शब्दांत टीका केली आहे.

Published on: Aug 31, 2026 4:12 PM
Follow Us