महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?

महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?

| Updated on: Sep 16, 2026 | 12:35 PM

महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळसदृश परिस्थितीच्या उंबरठ्यावर आहेत. पावसामुळे खरिपाची पिके संकटात सापडली असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील पिकांची स्थिती गंभीर आहे. सरकार दुष्काळाचा सामना करण्यासाठी उपाययोजनांची तयारी करत आहे.

राज्यातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर असून, पावसाअभावी खरीप पिके मोठ्या संकटात सापडली आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्र्यांनी या गंभीर स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला सतर्क राहण्याचे आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी उपाययोजनांची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.

विभागनिहाय पिकांच्या स्थितीवर नजर टाकल्यास, मराठवाड्यात बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पेरणी बाधित झाली आहे. लातूर, धाराशिव, परभणीमध्ये हलक्या जमिनीवरील पिकांना फटका बसला असून, सोयाबीनवर पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव दिसला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली, अहिल्यानगरच्या कोरडवाहू पट्ट्यात खरीप पिकांना मोठा फटका बसला असून, उत्पादनात 30 टक्क्यांपर्यंत घट अपेक्षित आहे.

विदर्भात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिममध्ये महिनाभरापासून पावसाचा खंड पडला आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागांत भात लागवडही लांबली आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, नंदुरबारमध्ये मका, कापूस यांसारख्या पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे, तर जळगावात केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्गला पावसाची तातडीची गरज आहे आणि नाचणीवर गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. सरकार दुष्काळी उपाययोजनांसाठी सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

 

Published on: Sep 16, 2026 12:35 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us