Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्…
कर्जमाफी योजनेतील साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या यादीत घोळ आढळल्याने सहकार विभागाने ती बँकांना परत पाठवली आहे. काही बँकांनी शेतकऱ्यांकडून अवाजवी व्याज आकारल्याचे समोर आले आहे. ही यादी दुरुस्त करून अचूक माहिती दिल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल. सरकारी निधीचा गैरवापर रोखण्यासाठी या खात्यांचे ऑडिट केले जाईल.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठ्या अनियमितता समोर आल्या आहेत. यामुळे सहकार विभागाने ही यादी संबंधित चार ते पाच बँकांना दुरुस्तीसाठी परत पाठवली आहे. काही बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर अवाजवी व्याज आकारले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांची नावे, खाते क्रमांक आणि प्रत्यक्ष कर्जाची रक्कम यात मोठ्या प्रमाणावर विसंगती आढळली आहे. या त्रुटी दूर करून अचूक माहिती सादर केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल, असे विभागाने स्पष्ट केले आहे. सरकारी निधीचा गैरवापर टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी सहकार विभाग या सर्व साडेपाच लाख खात्यांचे ऑडिट करणार आहे.
या प्रकरणी ज्या बँकांनी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळून त्यांचे कर्ज जास्त दाखवून सरकारची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे संकेत सहकार मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
