Bachchu Kadu : नागपुरातील आंदोलनानंतर बच्चू कडू मुंबईत, मुख्यमंत्र्यांसोबत काय झाली चर्चा?
नागपुरातील शेतकरी आंदोलनानंतर बच्चू कडू मुंबईत दाखल झाले. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी कर्जमाफीसाठी निश्चित तारीख देण्याची मागणी केली. सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले असले तरी, अतिवृष्टीच्या नुकसानीकडे सध्या भर असल्याचे म्हटले आहे. जोपर्यंत तारीख मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा बच्चू कडूंनी पवित्रा घेतला आहे.
नागपुरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ते आता मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची या मुद्द्यावर बैठक सुरू आहे. बच्चू कडूंनी या बैठकीत सरकारकडे कर्जमाफीची निश्चित तारीख जाहीर करण्याची मागणी केली आहे. तारीख किंवा नियोजित कालावधी सांगितल्याशिवाय नागपुरातील आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
दुसरीकडे, सरकारने कर्जमाफीला नकार दिला नसून, तो महायुती सरकारच्या जाहीरनाम्याचा भाग असल्याचे म्हटले आहे. मात्र, सध्या सरकारचा भर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत करण्यावर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. देवेंद्र फडणवीस यांनीही कर्जमाफीसाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली आहे. या बैठकीतून कर्जमाफीवर तोडगा निघणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या आंदोलनाला मनोज जरांगे पाटलांनीही पाठिंबा दर्शवला आहे.
