Mahayuti Conflict: नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली, रंगली शाब्दिक चकमक
सातारा येथे महायुतीचे मंत्री जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्यात नाद व दहशत या शब्दांवरून शाब्दिक वाद उफाळला आहे. गोरे यांनी नादाला लागल्यास सोडणार नाही असे म्हटले, तर देसाईंनी दमदाटीच्या भाषेला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेषतः साताऱ्यामध्ये, सध्या नाद आणि दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये शाब्दिक जुंपल्याचे चित्र आहे. यामध्ये मंत्री जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांचा समावेश आहे. जयकुमार गोरे यांनी अप्रत्यक्षपणे शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधत, “आमच्या नादाला कोणी लागलं तर सोडत नाही,” असे विधान केले. गोरे यांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी, हा इशारा देसाईंना उद्देशून असल्याचे मानले जात आहे. यावर पलटवार करताना मंत्री शंभूराज देसाई यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. “दमदाटी किंवा दहशतीची भाषा कुणी केली तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल,” असा सडेतोड इशारा देसाई यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात मोकळ्या आणि निर्भय वातावरणात काम झाले पाहिजे. “जर गोरेसाहेब असे म्हटले असतील की, माझा नाद केला तर मी त्याला जागा दाखवतो, तर याचा अर्थ त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांची दहशत असल्याचे मान्य केले आहे,” असे देसाई यांनी नमूद केले. या शाब्दिक चकमकीमुळे साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
