Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा आरक्षणावरून सरकारला थेट सवाल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी पुन्हा उपोषण सुरू केलं असून, सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी सरकारकडून काही आश्वासनंही देण्यात आली. मात्र, या घडामोडींनंतर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीतील नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी पुन्हा उपोषण सुरू केलं असून, सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी सरकारकडून काही आश्वासनंही देण्यात आली. मात्र, या घडामोडींनंतर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीतील नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत.
छगन भुजबळ यांनी जात पडताळणी समितीच्या कामकाजावर कोणताही दबाव आणू नये, अशी भूमिका मांडली. काही प्रमाणपत्रं जात पडताळणी समितीने नाकारली असून, ती दुरुस्त करून देण्याचं काही आमदारांकडून सांगितलं जात असल्याचा दावा त्यांनी केला. यावरून भुजबळांनी संबंधित आमदारांना थेट सवाल केला. “मुंबईत चार नगरसेवकांची जात पडताळणीतील प्रमाणपत्रं रद्द झाल्याने त्यांचं पद गेलं. त्यांचंही प्रमाणपत्र तुम्ही दुरुस्त करून देणार आहात का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कुणबी प्रमाणपत्रांबाबतही भुजबळांनी गंभीर आरोप केले. काही दाखल्यांमध्ये खाडाखोड करण्यात आल्याचा दावा करत, “खाडाखोड केलेले हे दाखले तुम्ही स्वीकारणार आहात का?” असा सवाल त्यांनी सरकारला केला. जात पडताळणी समिती ही अत्यंत महत्त्वाची संस्था असून, तिच्यावर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणला जाऊ नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, महायुतीच्या नेत्यांनी ओबीसी समाजाची भूमिका लक्षात घ्यावी, असा घरचा आहेरही भुजबळांनी दिला. “ओबीसींनी तुम्हाला मदत केली आहे. तुमचं सरकार आणण्यात त्यांचाही हातभार आहे,” असं सांगत त्यांनी सरकारला ओबीसी आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका घेण्याचं आवाहन केलं.
मराठा-कुणबी मंत्रालय सुरू करण्याच्या चर्चेवरही भुजबळांनी आक्षेप घेतला. “आता मराठा-कुणबी मंत्रालय सुरू करणार आहेत, हे कसं काय होईल? करायचं असेल तर प्रत्येक जातीसाठी करा,” असं ते म्हणाले. मराठा समाजाला दाखला देण्यास आपला विरोध नसल्याचं स्पष्ट करताना, ओबीसी आरक्षण संपता कामा नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
यासोबतच ओबीसी, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस या आरक्षणांबाबतही भुजबळांनी प्रश्न उपस्थित केला. “ओबीसी आरक्षण घेत आहेत, एसईबीसी आरक्षण घेत आहेत की ईडब्ल्यूएस आरक्षण घेत आहेत? एक विद्यार्थी तीन आरक्षणांचा कसा काय फायदा घेऊ शकतो?” असा सवाल त्यांनी केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारकडून सुरू असलेल्या हालचालींवर टीका करताना, “आमचा दाखल्याला विरोध नाही, मात्र ओबीसी आरक्षण संपता कामा नये,” अशी भूमिका भुजबळांनी पुन्हा स्पष्ट केली. दरम्यान, महायुतीतील काही मंत्री आणि नेते सातत्याने जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जात असल्याचा उल्लेख करत त्यांनी, “आमचे मंत्री सतत लाड पुरवण्यासाठी जात आहेत,” असा टोलाही लगावला.
