Manoj Jarange Morcha : हीच ती वेळ… उपोषण सुरू होताच तासाभरातच ‘हे’ दोन आमदार जरांगे पाटलांच्या भेटीला, काय झाली चर्चा?
बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार प्रकाशदादा साळुंके हे दोघेही आमदार तातडीने उपोषणस्थळी दाखल झालेत आणि त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाची मागणी लावून धरत उपोषणाला आजपासून सुरूवात केली आहे. जो पर्यंत सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशाराच जरांगेंनी दिला आहे. अशातच जरांगे उपोषणाला बसल्यानंतर लागलीच आझाद मैदानावर बीडचे दोन आमदार मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही आमदारांनी जरांगेच्या आंदोलनांना पाठिंबा जाहीर केला आहे. या भेटीनंतर संदीप क्षीरसागर आणि सोळंके यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे पाटील हे केवळ मराठा समाजासाठी नाहीतर ओबीसी समाजावर कुठे अन्याय झाला तरी ते रस्त्यावर उतरतात. ते सर्व समाजासोबत आहे. एक आवाहन केल्यानंतर एवढा समाज जमतो त्यामुळे या आंदोलनाला यश येणार आहे. तर सरकारने ठाम निर्णय घेण्याची हीच वेळ आहे, असे संदीप क्षीरसागर म्हणाले. दरम्यान, संदीप क्षीरसागर यांच्यासोबत आमदार प्रकाश सोळंके हे देखील आंदोलनस्थळी हजर होते. त्यांनी सुद्ध मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि जरांगेच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला.
