Asia Cup Trophy : आशिया चषक ACC च्या हवाली अन् ट्रॉफीचोर मोहसीन नक्वीचा अखेर माफीनामा, म्हणाला…
आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख मोहसीन नक्वी यांनी आशिया चषक ट्रॉफी आपल्या हॉटेलमध्ये नेल्याने वाद निर्माण झाला होता. भारतीय संघाने त्यांच्या हस्ते चषक स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर हा प्रकार घडला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) इशाऱ्यानंतर नक्वींनी अखेर माफी मागितली असून, चषक एसीसीकडे जमा केला आहे.
पाकिस्तानच्या मोहसीन नक्वी यांनी अखेर आशिया चषक ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) हवाली केली असून, या प्रकरणात घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषक जिंकल्यानंतर तो मोहसीन नक्वींच्या हस्ते स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे नियमांनुसार चषक एसीसीच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक होते. मात्र, नक्वींनी तो स्वतःच्या हॉटेलमध्ये नेल्याने मोठ्या प्रमाणात टीका झाली.
आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक बैठकीत या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला. भारताने नक्वींच्या या कृतीला विरोध दर्शवला. यावर मोहसीन नक्वींनी प्रश्न उपस्थित केला की, जर भारतीय संघाला माझ्या हस्ते ट्रॉफी स्वीकारायचीच नव्हती, तर त्यांनी याची कल्पना आधीच का दिली नाही? मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नक्वींना तुम्ही आशिया स्पर्धेचा चषक स्वतःच्या हॉटेलात का नेला, असा प्रतिप्रश्न केला. दरम्यान, संबंधित चषक भारताच्या हवाली करावा अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिल्यानंतर मोहसीन नक्वींनी माफी मागितल्याचे वृत्त आहे. यानंतर नक्वींनी आशिया चषक ट्रॉफी एसीसीकडे सुपूर्द केली.
