Kurla : अंगावर फेकली अंडी अन् दगड, ओतलं पेट्रोल अन् लावली आग.. बर्थडेचं असलं कसलं सेलिब्रेशन; कुठं घडला धक्कादायक प्रकार?

| Updated on: Nov 26, 2025 | 12:15 PM

कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर सिटी इमारतीत वाढदिवस साजरा करताना अब्दुल रहमान नावाच्या तरुणाला त्याच्या मित्रांनी पेट्रोल टाकून पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंडी आणि दगडफेक झाल्यानंतर हा प्रकार घडला. अब्दुल रहमान गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पाच आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर सिटी इमारतीमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. २१ वर्षीय अब्दुल रहमान नावाच्या तरुणाचा वाढदिवस साजरा करत असताना त्याच्याच मित्रांनी त्याला पेट्रोल टाकून पेटवून दिले. या घटनेत अब्दुल रहमान गंभीररित्या भाजला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल रहमानला वाढदिवसाच्या निमित्ताने मित्रांनी खाली बोलावले होते. केक कापण्याऐवजी त्याच्यावर अंडी आणि दगड फेकण्यात आले. यानंतर अंगावर काही केमिकल टाकून आग लावण्यात आली. चौकशीतून समोर आले आहे की, हा प्रकार पूर्वनियोजित होता. आरोपींनी दुपारीच पेट्रोल घेऊन जाण्याचा आणि अब्दुल रहमानला आग लावण्याचा कट रचला होता. आग लागल्यानंतर अब्दुल रहमानने स्वतःच टी-शर्ट काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अब्दुल रहमानच्या पाच मित्रांना अटक केली आहे. त्यांना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, हे केमिकल पेट्रोल होते की अन्य काही, याचा सखोल तपास सुरू आहे.

Published on: Nov 26, 2025 12:15 PM