Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
मुंबईतून परतीच्या पावसानंतर तापमानात मोठी वाढ झाली आहे. सांताक्रुज वेधशाळेनुसार, मुंबईत 37.6°C तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथे 35.4°C तापमान होते. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. ऑक्टोबर हिटचा अनुभव मुंबईकर घेत आहेत, जी 2015 नंतरची दुसरी सर्वोच्च नोंद आहे.
मुंबईत परतीच्या पावसानंतर तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागला आहे. भारतीय हवामान विभागाने 3 ऑक्टोबर रोजी मुंबईतून पावसाने माघार घेतल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर लगेचच शहरात तापमानाचा पारा वाढला आहे.
गेल्या गुरुवारी, सांताक्रुज वेधशाळेने 37.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली, तर कुलाबा वेधशाळेनुसार 35.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ही वाढती उष्णता लक्षात घेता, हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. आज देखील तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, ऑक्टोबर महिन्यातील ही 37.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद 2015 नंतरची दुसरी सर्वोच्च नोंद आहे. 2015 मध्ये ऑक्टोबरमध्ये 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची सर्वाधिक नोंद झाली होती. जून आणि जुलैमध्ये समाधानकारक पाऊस पडला असला तरी, त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे आता ऑक्टोबर हिटचा अनुभव मुंबईकर घेत आहेत. हवामानातील बदलांमुळे मुंबईच्या हवेत धुक्याचे प्रमाणही दिसून येत आहे.
