मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा…
मुंबईकरांसाठी चिंतेची बाब म्हणजे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे सध्या तो केवळ 12.12 टक्क्यांवर आला आहे. पाणी कपात लागू असतानाही उपलब्ध साठा फक्त सुमारे एका महिन्यापुरता शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या एकूण 1 लाख 75 हजार 465 दशलक्ष लिटर इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पावसाळा वेळेत सुरू होण्याकडे आणि तलाव क्षेत्रातील पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तलावनिहाय आकडेवारीनुसार, भातसा तलावामध्ये सर्वाधिक 43.36 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर अप्पर वैतरणा तलावातील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्यांवर पोहोचला आहे. इतर तलावांतील साठाही चिंताजनकरीत्या कमी झाल्याने पाणी व्यवस्थापनाचे आव्हान वाढले आहे.
दरम्यान, पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने 15 मेपासून शहरात 10 टक्के पाणी कपात लागू केली आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पालिकेकडून वारंवार करण्यात येत आहे.
पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणीटंचाईची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याची गरज अधोरेखित केली जात आहे.