Mahayuti | नाशिकमध्ये महायुतीचा मोठा पेच! गीते बंधूंनी वाढवलं टेन्शन

Mahayuti | नाशिकमध्ये महायुतीचा मोठा पेच! गीते बंधूंनी वाढवलं टेन्शन

| Updated on: Jun 03, 2026 | 3:33 PM

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरीचे चित्र कायम आहे. विशेषतः नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, उमेदवारीवरून राजकीय नाट्य रंगताना दिसत आहे.

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरीचे चित्र कायम आहे. विशेषतः नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, उमेदवारीवरून राजकीय नाट्य रंगताना दिसत आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी सुरुवातीला भाजपकडून गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या महायुतीच्या बैठकीत नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी अर्ज दाखल केला.

दरम्यान, या घडामोडींमध्ये आणखी एक ट्विस्ट समोर आला. गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याने नाशिकमधील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत. यामुळे महायुतीसमोर बंडखोरीचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी गणेश गीते आणि गोकुळ गीते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. मात्र, गीते बंधू सध्या शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही काही नेत्यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे. विष्णुपंत म्हैसधुने आणि गोरख बोडके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, गोरख बोडके यांनी मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांची भेट घेत निवडणुकीतून माघार घेण्याबाबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेनंतर काही बंडखोर उमेदवार लवकरच माघार घेतील, अशी अपेक्षा उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीशी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्य आणि नगरसेवक आपला पाठिंबा नेमका कोणाला देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्यापूर्वी नाशिकमधील राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता असून, बंडखोर उमेदवारांची भूमिका महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Published on: Jun 03, 2026 3:33 PM
Follow Us