Girish Mahajan | उदय सामंतांना जमलं नाही, आता महाजन मैदानात; बंडखोरांच्या मनधरणीसाठी थेट नाशिकला रवाना?
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोरील बंडखोरीचे आव्हान कमी करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन नाशिककडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात नाशिकमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून, बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यास तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोरील बंडखोरीचे आव्हान कमी करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन नाशिककडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात नाशिकमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून, बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यास तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीकडून अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेल्या नाराजीमुळे काही उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे महायुतीची चिंता वाढली असून पक्ष नेतृत्वाकडून समन्वयाचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, गोकुळ गीते यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका कायम ठेवली असून ते सध्या माघार घेण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गिरीश महाजन यांनी त्यांच्या भूमिकेत सकारात्मक बदल होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे, गणेश गीते यांनी निवडणुकीतून माघार घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. महाजन यांच्या मध्यस्थीनंतर गणेश गीते यांची माघार जवळपास निश्चित मानली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यापूर्वी शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनीही गीते बंधूंची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यानंतर आता गिरीश महाजन यांनी थेट संवाद साधत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
नाशिक विधान परिषद निवडणुकीत बंडखोरांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न यशस्वी होतात की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी काही तासांत गोकुळ गीते यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर नाशिकमधील निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
