धक्कादायक! नाशिक रोडजवळ धावत्या रेल्वेतून पडून दोघांचा मृत्यू
नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ धावत्या कर्मभूमी एक्स्प्रेसमधून पडून दोन युवकांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. मुंबईहून बिहारकडे जाणाऱ्या या गाडीला दिवाळी आणि बिहार निवडणुकांमुळे प्रचंड गर्दी होती. यामुळे प्रवाशी दारात उभे असावेत, अशी प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने गाड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.
नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यात एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनल्स येथून बिहारमधील रक्सोलकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसमधून काल रात्री तीन जण खाली पडले. यापैकी ३० ते ३५ वयोगटातील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. दिवाळी आणि बिहारमधील निवडणुकांमुळे सध्या परराज्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे हे युवक गाडीच्या दारात उभे असावेत आणि गर्दीमुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेच्या ठिकाणी अपघातग्रस्तांच्या चपला, रक्त आणि सामान विखुरलेले आढळले. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली जात आहे.
