Babasaheb Patil : कर्जमाफीचा नाद म्हणता मग मतांची भीक म्हणायचं का? मंत्र्यानंच शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर माफी
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. "लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्ही निवडून येण्यासाठी आश्वासनं देतो," असे विधान त्यांनी केले. यानंतर सर्व स्तरातून तीव्र टीका झाली. जखमेवर मीठ चोळण्यासारखे हे वक्तव्य असल्याचे बोलले गेले. वाढत्या टीकेनंतर पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अतिवृष्टीमुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना उद्देशून “लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्ही निवडून येण्यासाठी निवडणुकीत आश्वासनं देतो,” असे पाटील यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळल्याची भावना व्यक्त होत आहे.
बाबासाहेब पाटील ज्यांच्या मतांवर निवडून आले आणि कॅबिनेट मंत्री झाले, त्याच शेतकऱ्यांविषयी असे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर चौफेर टीका झाली. विरोधकांकडूनही या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. या वादग्रस्त वक्तव्यानंतर टीकेची झोड उठल्याने बाबासाहेब पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली. दुधाशी संबंधित योजनांमध्ये कर्जमाफी बसत नाही, हेच सांगण्याचा माझा उद्देश होता, असे स्पष्टीकरण देत त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.
