Nitin Gadkiri : माझ्यावर कितीही आरोप झाले तरी… गडकरींनी भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळत केलं मोठं विधान
नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे की त्यांनी आजपर्यंत कोणत्याही कंत्राटदाराकडून एकही रुपया स्वीकारलेला नाही. त्यांनी खोटी कामे केली नाहीत आणि खोट्या आरोपांमुळे विचलित होणार नाहीत असे म्हटले.
आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून एक रुपयाही स्वीकारलेला नाही. आपल्यावर होणाऱ्या कोणत्याही आरोपांमुळे आपण विचलित होणार नाही, कारण आपण कधीही खोटी कामे केली नाहीत, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. गडकरींनी त्यांच्या इथेनॉलवर चालणाऱ्या इनोव्हा गाडीचा उल्लेख केला. ही गाडी धानाच्या कणीपासून, मक्यापासून, उसाच्या रसापासून आणि मुलासेसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर १०० टक्के चालते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळत असून, पर्यावरणातील प्रदूषणही कमी होत आहे.
गडकरींच्या मते, देशाचे २२ लाख कोटी रुपये जे इंधनाच्या आयातीवर खर्च होत होते, ते आता वाचले आहेत. यामुळे परदेशी इंधनाचा व्यापार करणाऱ्या लोकांचे मोठे नुकसान झाले आहे, आणि याच कारणामुळे ते नाराज होऊन आपल्याविरुद्ध पेड न्यूज पसरवत आहेत. मात्र, जनतेचे प्रेम आपल्या पाठीशी असल्याचे गडकरींनी म्हटले. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे कंत्राटदार त्यांना घाबरतात आणि त्यामुळे कोणतीही खोटी कामे होत नाहीत, असे त्यांनी नमूद केले.
