मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी OBC महासंघ रणांगणात; सरकारची डोकेदुखी वाढली

| Updated on: May 29, 2026 | 10:39 AM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हं दिसत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून भर उन्हात पुन्हा उपोषण आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर आता राष्ट्रीय ओबीसी महासंघानेही आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “मराठा समाजाच्या मागण्यांना आमचा विरोध नाही. मात्र त्या मागण्या पूर्ण करताना मूळ ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागता कामा नये.” जर ओबीसी आरक्षणात कपात झाली किंवा त्याच्या हक्कांवर गदा आली, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी तायवाडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या ‘सगे सोयरे’ कायद्याच्या अंमलबजावणीच्या मागणीवरही भाष्य केलं. “त्या अध्यादेशाची अंमलबजावणी आधीच सुरू आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून ओबीसी समाजाच्या आरक्षणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे गंभीर पडसाद उमटतील,” असं ते म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रीय ओबीसी महासंघ सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र सरकारने दबावाखाली येत ओबीसी आरक्षणात कोणताही बदल केल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल आणि राज्यभर आंदोलन उभं राहील, असा इशारा त्यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं असून मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजांच्या भावना संतुलित ठेवत सरकार कोणता निर्णय घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Published on: May 29, 2026 10:39 AM
Follow Us