ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत मोठा निर्णय

ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत मोठा निर्णय

| Updated on: Jun 21, 2026 | 10:59 AM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पुण्याहून धाराशिवकडे रवाना होताना त्यांनी आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या आपला राजकीय निर्णय जाहीर करण्याचे संकेत दिले.

माध्यमांशी संवाद साधताना निंबाळकर म्हणाले की, अंतिम निर्णय कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल. धाराशिवमधील गोवर्धनवाडी येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाच्या निकालाबाबतही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. “२० वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबाने मोठे दुःख भोगले. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो, मात्र न्याय मिळावा यासाठी पुढील कायदेशीर लढा सुरू राहील,” असे त्यांनी म्हटले.

निंबाळकर यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) केलेल्या तपासाच्या आधारे न्याय मिळावा, अशी मागणी उच्च न्यायालयात करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, वडिलांच्या निधनानंतरच सार्वजनिक जीवनात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आणि गेली अनेक वर्षे मतदारसंघातील लोकांच्या प्रश्नांसाठी काम करत आहोत. “आजही माझा निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना आणि मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा लक्षात घेऊनच घेतला जाईल,” असे ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेतील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये ओमराजे निंबाळकर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, त्यांच्या निर्णयाचा परिणाम इतर बंडखोर खासदारांच्या पुढील राजकीय वाटचालीवरही होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Published on: Jun 21, 2026 10:56 AM
Follow Us