सरकारमध्ये अहंकार निर्माण झाला आहे, ऑपरेशन सिंदूरवरून गोगोईंंचा सरकारवर हल्लाबोल
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी, ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू झाली.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी, सोमवारी दुपारी २:०५ वाजता लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू झाली. सरकारच्या वतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ही चर्चा सुरू केली. लोकसभेत या विषयावर चर्चेसाठी १६ तासांचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.
यावेळी कॉंग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, “मी त्या प्रसंगाला कधीच विसरू शकत नाही, जेव्हा एक आई आणि तिची मुलगी चालत असताना त्यांनी एका सैनिकाला त्यांना जाऊ देण्याची विनंती केली, कारण दहशतवाद्यांनी लष्कराचा गणवेश परिधान केला होता. त्या सैनिकाला सांगावे लागले, ‘घाबरू नका, मी खरा सैनिक आहे.’ या भीतीबद्दल तुम्ही एक शब्दही बोलू शकता. ही तुमची जबाबदारी आहे, आणि ही संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी आहे. संरक्षणमंत्री सातत्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांचा कणा मोडल्याचा दावा करतात, पण तरीही हल्ले सुरूच आहेत. सरकारमध्ये अहंकार निर्माण झाला आहे. त्यांना वाटते की त्यांनी कितीही मोठी चूक केली, तरी कोणी प्रश्न विचारणार नाही. पण आम्ही प्रश्न उपस्थित करू. पंतप्रधान मोदी सौदी अरेबियात होते, परत आल्यानंतर ते बिहारला गेले आणि निवडणूक भाषण दिले, पण पहलगामला भेट दिली नाही. तिथे जाणे हे त्यांचे कर्तव्य होते, असंही त्यांनी म्हंटलं.
