PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बालपणीचे मित्र अजगर अली व्होरा यांनी मीरा-भाईंदरमधील आपल्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा आरोप केला आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहतांशी संबंधित कंपन्यांवर बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपल्याचा त्यांचा दावा आहे. पंतप्रधानांच्या भेटीनंतर पालिका यंत्रणा सक्रिय झाली असून, या प्रकरणी तातडीची सुनावणी ठेवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालपणीचे मित्र अजगर अली व्होरा यांनी मीरा-भाईंदरमधील आपल्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहतांशी संबंधित सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन आणि स्वयंम बिल्डर्स या कंपन्यांवर पालिका आणि पोलिसांशी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा दावा केला आहे. व्होरा यांनी १९८९ मध्ये भाईंदर पूर्वेतील नवघर येथे २,८१० चौरस मीटर जमीन कायदेशीररित्या खरेदी केली होती.
ही जमीन कोणालाही विकली किंवा हस्तांतरित केली नसतानाही २०११ मध्ये बनावट कागदपत्रांद्वारे तिचे दोन तुकडे करून त्यावर आरोपी कंपन्यांची नावे जोडण्यात आली, असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी २०१५ मध्ये एफआयआर दाखल झाला होता, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. व्होरा यांनी ८ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन थेट सीबीआय चौकशीची मागणी केली. या भेटीनंतर स्थानिक प्रशासन आणि मीरा-भाईंदर पालिका खडबडून जागी झाली आहे. पालिकेने १६ सप्टेंबर रोजी या प्रकरणी तातडीची सुनावणी आयोजित केली असून, व्होरा यांना आता न्याय मिळण्याची आशा आहे.
