Pune : शंकर महाराज अंगात अन्… भोंदू महिलेनं असे केले 14 कोटी लंपास, पुण्यातलं इंजिनिअर दाम्पत्य देशोधडीला

Pune : शंकर महाराज अंगात अन्… भोंदू महिलेनं असे केले 14 कोटी लंपास, पुण्यातलं इंजिनिअर दाम्पत्य देशोधडीला

| Updated on: Nov 06, 2025 | 11:24 AM

पुण्यात एका उच्चशिक्षित इंजिनिअर दांपत्याला त्यांच्या मुलींच्या आजारातून बरे करण्याच्या नावाखाली १४ कोटी रुपयांना गंडवण्यात आले. वेदिका पंढरपूरकर आणि दीपक खडके यांनी शंकर महाराज अंगात येत असल्याचे भासवून हे पैसे, पुणे घर, इंग्लंडमधील बंगला आणि फार्म हाऊसही लुटले. तक्रारीनंतर वेदिका पंढरपूरकर गायब झाल्या आहेत.

पुण्यात एका धक्कादायक घटनेत, एका उच्चशिक्षित इंजिनिअर दाम्पत्याला भोंदूगिरीच्या जाळ्यात ओढून तब्बल १४ कोटी रुपयांना फसवल्याचा आरोप समोर आला आहे. आपल्या मुलींच्या दुर्धर आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी तळमळत असलेल्या दीपक डोळस आणि त्यांच्या शिक्षक पत्नीला दीपक खडके या व्यक्तीने वेदिका पंढरपूरकरकडे नेले. वेदिकाने तिच्या अंगात शंकर महाराज येत असल्याचे सांगून दांपत्याला आमिष दाखवले.

आरोपानुसार, वेदिका पंढरपूरकरने त्यांच्या पैशांमध्ये दोष असल्याचे आणि मुलींच्या उपचारासाठी ते आपल्या बँक खात्यात वळते करण्यास सांगितले. त्यानंतर, कुटुंबाच्या घरातील दोष दूर करण्याच्या नावाखाली इंग्लंडमधील बंगला, फार्म हाऊस आणि पुण्यातले घर विकून पैसे वळते करण्यास भाग पाडले. मुलींच्या आजारपणामुळे हवालदिल झालेल्या डोळस दांपत्याने सर्व गमावले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पुणे पोलिसांकडे १४ कोटींच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, तक्रार दाखल होताच वेदिका पंढरपूरकर तिच्या पतीसह पुण्यातील महात्मा सोसायटीतील आलिशान बंगल्यातून गायब झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेने पुण्यासारख्या शिक्षित शहरातही अंधश्रद्धेचा विळखा किती घट्ट आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Published on: Nov 06, 2025 11:24 AM