खडसेंच्या जावयाची रेव्ह पार्टी आणि पोलिसांची धाड.. व्हिडीओ आला समोर | VIDEO
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे, ज्यामुळे तीव्र वादाला तोंड फुटले आहे.
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे, ज्यामुळे तीव्र वादाला तोंड फुटले आहे. गेल्या तीन दिवसांपासून हनी ट्रॅप प्रकरणावरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू होती. भाजपच्या आमदारांनीही खडसेंवर तिखट टीका केली होती. या सगळ्यामध्ये मध्यरात्री खराडी येथे सुरू झालेल्या रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा सहभाग असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यांच्यासह इतर काही जणांना ताब्यात घेतले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, या पार्टीशी संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही व्यक्ती पार्टी करताना दिसत आहेत.
पोलिसांच्या मते, या रेव्ह पार्टीत मोठ्या प्रमाणात पैसे उधळण्यात आले, तसेच दारूचा प्रचंड साठा आणि अंमली पदार्थ आढळून आले. या पार्टीत सहभागी असलेल्या एका व्यक्तीचे क्रिकेट बुकी असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रेव्ह पार्टी पहाटे ३ वाजता सुरू झाली होती, आणि येथे गांजा व कोकेनसारख्या अंमली पदार्थांचे सेवन झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
