Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?

Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?

| Updated on: Jun 09, 2026 | 5:25 PM

पावसाने अद्याप जोर धरला नसल्याने पुणे शहरावर मोठ्या पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण समूहातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचल्याने पुणे महानगरपालिकेने पाणी कपातीचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शहरात पुढील आठवड्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

पावसाने अद्याप जोर धरला नसल्याने पुणे शहरावर मोठ्या पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण समूहातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचल्याने पुणे महानगरपालिकेने पाणी कपातीचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शहरात पुढील आठवड्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यंदा मान्सूनला झालेला विलंब आणि वाढलेली उष्णता यामुळे धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. सध्या खडकवासला धरण समूहात केवळ सुमारे 5 टीएमसी पाणी शिल्लक असून, पुणे शहरासाठी दरमहा अंदाजे 1.6 टीएमसी पाण्याची गरज भासते. उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी महापालिकेला हा निर्णय घ्यावा लागला आहे.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पाण्याची नासाडी टाळावी, आवश्यक तेवढाच वापर करावा आणि घरगुती गरजांसाठी पुरेसा साठा करून ठेवावा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कार वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल तसेच बांधकाम क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर निर्बंध घालण्याचाही विचार सुरू आहे. व्यावसायिक कारणांसाठी होणारा अतिरिक्त पाण्याचा वापर कमी करण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. नागरिकांना पूर्वतयारी करता यावी यासाठी एका आठवड्याचा अवधी देण्यात आला आहे.

सध्या काही भागांत तांत्रिक कारणांमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय पूर्ण क्षमतेने लागू केला जाणार आहे. यासंदर्भात जलसंपदा विभागाशीही चर्चा सुरू असून, अंतिम आराखडा लवकरच जाहीर केला जाणार आहे. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नागरिकांना पाण्याचा अपव्यय पूर्णपणे थांबवण्याचे आवाहन केले असून, परिस्थिती लक्षात घेता सर्वांनी जबाबदारीने पाणी वापरण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.

Published on: Jun 09, 2026 5:25 PM
Follow Us