Raj Thackeray : गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रावर सक्ती का?, राज ठाकरेंचा घणाघात
Raj Thackeray Press Conference : गुजरातमध्ये हिंदी भाषेची सक्ती नसताना महाराष्ट्रावर सक्ती का? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
जर गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही तर मग महाराष्ट्रावर हिंदी भाषेची सक्ती का? सहावीपासून हिंदीचा पर्याय आहे मग तो पहिलीपासून का आणला जातो आहे? आयएस अधिकाऱ्यांना हिंदी बोलणं सोपं जावं यासाठीची धोरणं आहेत का?, असे घणाघाती प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारला केले आहेत. महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणाबाबत प्रश्न उपस्थित करत राज्यातील शाळांना पाहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध दर्शवण्यासाठी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर त्यांनी याबाबत विचार करायला पाहिजे. कोणत्या शाळा हिंदी शिकवत आहेत ते मला बघायचंच आहे, असंही यावेळी ठाकरेंनी म्हंटलं.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, केंद्राचं शैक्षणिक धोरण आणि त्याबाबतचा जो दाखला मुख्यमंत्री देत आहेत ते खोटं बोलत आहेत. तुमची गरज असेल तेव्हा तुम्ही ती भाषा शिकाल. भाषा लादायची याला काय अर्थ आहे? मध्य प्रदेशात, बिहारमध्ये, उत्तर प्रदेशात तिसरी भाषा काय मराठी शिकवणार आहात का? हिंदीची सक्ती गुजरातमध्येही नाही. मग महाराष्ट्रातच का हे केलं जातं आहे? महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मराठी आहात म्हणजे कोण तर मराठी बोलणारे तुमचं अस्तित्व मिटवायला हे निघाले आहेत, अशी टीका देखील राज ठाकरेंनी केली आहे.
