Ajit Pawar NCP : रूपाली ठोंबरे पाटलांनंतर रूपाली चाकणकर अजितदादांच्या भेटीला, राष्ट्रवादीतील वादावर तोडगा निघणार?
पुण्यात रुपाली चाकणकर यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीपूर्वी रुपाली ठोंबरे पाटीलही भेटल्या होत्या. रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातील पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी अजित पवार मध्यस्थी करत आहेत. आगामी निवडणुका आणि पक्ष बांधणीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीपूर्वी काही वेळ अगोदरच रुपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर यांनीही अजित पवारांची भेट घेतली होती. रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांनी यापूर्वीच एका बैठकीत दोघींनाही सूचना दिल्या होत्या की, “माझे सर्व गोष्टींवर लक्ष असते.” माधवी खंडाळकर यांनी दाखल केलेल्या पोलिसातील तक्रारीनंतर हा वाद अधिक वाढला. रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर समाज माध्यमांवर टीका केल्यामुळे पक्षाने त्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पक्षाकडून आढावा बैठकांचे सत्र सुरू असताना, अजित पवार या पक्षांतर्गत वादावर काय तोडगा काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही भेट राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत सलोख्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
