Saamana : गुजरात व्यापारी पॅटर्न, कावेबाज कारस्थानी लोकं म्हणत ‘सामना’तून भाजप-शिंदेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र
नाबाद ५९ म्हणत आजच्या सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखात शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह भाजपवर निशाणा साधलाय. बघा नेमकं काय म्हटलंय.
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीची चर्चा होतेय. तर दुसरीकडे राज ठाकरेंचा मनसे पक्ष आणि उद्धव ठाकरे या दोघांची युती होणार का? भविष्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? हा एकच विषय चर्चेत आहे. अशातच आज शिवसेनेचा वर्धापन दिन मुंबईत साजरा होत आहे.
दरम्यान, आजच्या सामनामधून फडणवीस-राज भेटीवरून भाजप, शिंदेंच्या सेनेवर टीकास्त्र डागलंय. ‘जे सोबत येतील त्यांना घेऊन, नाहीतर एकाकी लढून. महाराष्ट्राचा मराठी बाणा कायम राखण्यासाठी सर्व घाव एकाकी झेलून शिवसेना लढायला तयार आहे. पण एक मात्र नक्की, शिवसेना कदापि गुजरात व्यापारी पॅटर्नपुढे झुकणार नाही’, असं सामनातून म्हटलंय. तर लोकांत संभ्रम, संशय निर्माण करणे, मराठी माणसांच्या एकजुटीला ‘ब्रेक’ लागल्याचा आनंद साजरा करणे हाच राज्यातील सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे. मात्र या सर्व कावेबाज कारस्थानी लोकांच्या छाताडावर पाय रोवून शिवसेना 59 वर्षे ठामपणे उभी आहे. शिवसेना शतायुषी होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
