Sangli Baby Missing : रुग्णालयातून चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांनी 48 तासात घेतला शोध अन्…
बाळ चोरणाऱ्या सारा साठेकडून या बाळाला सुखरूपपणे ताब्यात घेण्यात आलं, त्यानंतर बाळाला स्वतः सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी आपल्या पोलीस दलासह मिरज शासकीय रुग्णालयात जाऊन बाळ सुखरूप पणे तिच्या आईकडे स्वाधीन केलं.
सांगलीच्या मिरज रुग्णालयामधून चोरी झालेलं बाळ अखेर आईच्या कुशीत सुखरूपपणे पोहोचल्याची बातमी समोर आली आहे. सांगली पोलिसांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे एका आईला तिचं चोरीला गेलेलं बाळ मिळालं, मिरज शासकीय रुग्णालयात बाळाला आईच्या कुशीत देण्याचा हा प्रसंग भावनिक आणि सुखद आनंद देखील देणारा ठरला आहे. या निमित्ताने सांगली पोलीस दल कौतुकास पात्र ठरल्याचं चित्र पाहायला मिळालं.
दोन दिवसांपूर्वी मिरज शासकीय रुग्णालयातून एका महिलेकडून तीन दिवसाच्या नवजात बाळाची चोरीचा प्रकार घडला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. रूग्णालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून एका महिलेने बाळाला चोरी केलं होतं. त्यामुळे चोरीला गेलेल्या बाळाला शोधण्याचं एक मोठं आव्हान सांगली पोलीस दलासमोर होतं. अखेर पोलिसांनी रात्रंदिवस अथक प्रयत्न करत अवघ्या 48 तासात चोरीला गेलेल्या बाळाचा शोध घेतला आणि त्या बाळाला सुखरूप पणे तिच्या आईच्या स्वाधीन केले आहे. बाळ चोरणाऱ्या सारा साठे या महिलेला तिच्या पतीसह तासगावच्या सावळज येथून अटक करण्यात आली आहे.
