खाकीवाल्याचा काळा धंदा! छापल्या करोडोंच्या खोट्या नोटा

खाकीवाल्याचा काळा धंदा! छापल्या करोडोंच्या खोट्या नोटा

| Updated on: Oct 12, 2025 | 10:46 AM

सांगली पोलिसांनी बनावट नोटांच्या छपाई आणि वितरणाचे मोठे रॅकेट उघड केले आहे. तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांच्या खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या असून, कोल्हापूर पोलीस दलातील एका शिपायासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सिद्धलक्ष्मी अमृततुल्य चहा कंपनीच्या नावाखाली हा काळा धंदा सुरू होता.

सांगली पोलिसांनी बनावट नोटांच्या छपाई आणि वितरणाचे एक मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या कारवाईत तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांच्या खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, कोल्हापूर पोलीस दलातील एक हवालदारच या काळ्या धंद्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे. सांगलीच्या मिरज परिसरातून या रॅकेटचे संचालन केले जात होते, तर बनावट नोटांची छपाई कोल्हापूरमध्ये होत होती.

नोटांच्या वितरणासाठी सांगलीत सिद्धलक्ष्मी अमृततुल्य चहा या नावाने एक कंपनी उभी करण्यात आली होती. प्रत्यक्षात चहाच्या व्यवसायाच्या नावाखाली याच दुकानातून खोट्या नोटा बाजारात पाठवल्या जात होत्या. पुणे-बंगळूरू महामार्गावर केलेल्या कारवाईत पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला. इबरार इनामदार नावाचा कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार या टोळीचा प्रमुख आरोपी आहे. त्याच्यासह सुप्रित देसाई, राहुल जाधव, नरेंद्र शिंदे आणि सिद्धेश म्हात्रे अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हे रॅकेट पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील विविध ठिकाणी बनावट नोटा पाठवत होते.

Published on: Oct 12, 2025 10:46 AM