अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं आवाहन; देशात मोठ्या उलथापालथी होणार?
शिवसेना ठाकरे गटातील प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केलेले एक विधान राजकरणात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अखंड काँग्रेसचा नारा देत मोठे राजकीय वक्तव्य केले आहे
शिवसेना ठाकरे गटातील प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केलेले एक विधान राजकरणात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अखंड काँग्रेसचा नारा देत मोठे राजकीय वक्तव्य केले आहे. देशात भाजपला मजबूत पर्याय उभा करायचा असेल तर काँग्रेस अधिक सक्षम होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या राज्यस्तरीय पक्षांनी आता पुन्हा एकत्र येण्याची गरज असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.
दिल्लीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. काँग्रेसमधून बाहेर पडलेले अनेक पक्ष आजही काँग्रेससोबत काम करत आहेत. हे सर्व पक्ष एकत्र आले तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला मोठे आव्हान निर्माण होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राऊत यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
