राज्याच्या राजकारणाचा कोठा.. कोठीची हमीदाबाई..; हनीट्रॅप प्रकरणी राऊतांचा घणाघात
हनीट्रॅप प्रकरणावरून प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यात खळबळ उडवणाऱ्या हनीट्रॅप प्रकरणाचा तपास हा केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करावा असं आहे. महाराष्ट्राचे पोलीस याचा तपास करू शकणार नाही. कारण महाराष्ट्राचे पोलीस हे फक्त पेनड्राइव्ह आणि सीडी कुठे लपवली आहे हे शोधण्यासाठी हा तपास करत आहेत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हनीट्रॅप प्रकरणावरून आज प्रसार माध्यमांशी बोलताना राऊतांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणाचा आता कोठा झाला आहे आणि या कोठयावर जे आत्ता नाचत आहेत. त्यांना नाचवणारी कोठीची हमीदाबाई ही दिल्लीतच आहे. प्रफुल लोढा पेढा कोणाला भरवतो आहे? मिठी कोणाला मारतो आहे? दुसऱ्याच नाव घेतल्याने गिरीश महाजन यांच्यावरचे डाग धुतले जाणार नाही. मंत्रीमंडळात जे स्वत:ला मुख्यमंत्र्यांचा संकट मोचक समजून घेत आहेत, त्यांचं स्वत:चं चारित्र्य कसं आहे? असा उपरोधक प्रश्न देखील यावेळी संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
